भाळवणी / महादेव धनवडे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले त्यामुळे कही खुशी कही गम असे चित्र दिसत असतानाच खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने येथून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. कडेगाव तालुक्याचे युवा नेते डॉ.जितेश कदम हे भाळवणी जिल्हा परिषद गटातून उतरण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जितेश कदम यांची एन्ट्री होणार की नाही होणार या फक्त चर्चेनेच इच्छुक विरोधक धास्तावले आहेत. सोशल मीडिया वरून जितेश भैयांच्या समर्थकांनी आत्तापासूनच बॅनरबाजी चालू केली आहे.
भाळवणी जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या गटामध्ये शिवसेना,भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. कडेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी कोणत्याच गटामध्ये खुले आरक्षण पडलेले नाही. कडेगाव तालुक्याला लागून भाळवणी जिल्हा परिषद गट येत असल्याने आणि येथील आरक्षण खुले असल्याने त्याचबरोबर या संपूर्ण गटामध्ये कदम गटाची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याने जितेश भैय्या साठी या गटातून उमेदवारीसाठी चाचपणी चालू आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो. त्यामुळे अगोदरपासूनच इच्छुक असलेले उमेदवार आपल्या आर्थिक ताकदीचा अंदाज घेऊनच इच्छुक आहे असे सांगत आहेत. त्यातच डॉ.जितेश कदम या गटातून उभा राहिल्यास कदम बंधूंच्या आर्थिक ताकदी पुढे टिकायचे म्हणजे कधी कुणाचा कार्यक्रम होईल सांगता येत नाही असे मतदारातून बोलले जात आहे.
कदम बंधूंच्या सोनहिरा,उदगिरी आणि भारती शुगर च्या माध्यमातून या गटातील प्रत्येक गावातील कामगार या कारखान्यामध्ये कामाला आहेत. त्याचबरोबर या कारखान्याच्या तसेच भारती हॉस्पिटल व भारती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या गटातील प्रत्येकाचा कदम कुटुंबाशी नेहमी संपर्क येत असतो. त्यामुळे कदम बंधूंच्या शक्तीपुढे भले भले मागे सरकणार आहेत. याची चर्चा भाळवणी जि.प गटातील प्रत्येक गावागावातील मतदारांमध्ये सध्या सुरू असल्याचे दिसत आहे.

0 टिप्पण्या