शिरसगाव : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वा वरती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. सत्यशोधक समाजाचा प्रचार- प्रसार करणाऱ्या भाऊराव पाटील यांनी समाज बदलायचा असेल तर शिक्षणा इतके प्रभावी चांगले दुसरे साधन नाही हे ओळखले होते. बहुजन वर्गाला शिक्षणाच्या संधी नव्हत्या अशा काळात कर्मवीरांनी अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना गोळा करून वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण कार्याला सुरुवात केली. त्यांच्या कार्याला रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी साथ दिली. समाजाने कर्मवीरांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी भरभरून मदत केली. मात्र समाजाने जेवढे दिले होते त्याच्या कित्येक पटीने कर्मवीरांनी व रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थी घडवून समाजाला परत केले आहे. त्यामुळेच आजही समाजात रयत शिक्षण संस्थेची मोठी पत आहे. आण्णांच्या कार्याला महात्मा गांधी, महाराजा सयाजीराव गायकवाड, संत गाडगेबाबा, बंडो गोपाळा मुकादम, डी.पी.भोसले यांसारख्या असंख्य लोकांनी मदत केली. ज्या काळात शिकणे ही गोष्ट दुरापास्त होती त्याकाळात आपले विद्यार्थी परदेशात पाठवून त्यांना उच्च विद्याविभूषित करण्याचे काम कर्मवीरांनी पूर्ण केले. सर्व जातीच्या मुलांना एकत्र निवास, शिक्षण व भोजन व्यवस्था असणारी वसतिगृहे म्हणजे समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे एक प्रकारचे संस्कार वर्ग होते. आण्णांनी आपल्या शिक्षण कार्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी यांच्या इतकेच समाजातील रयत प्रेमी लोकांच्या वरती विश्वास ठेवला होता. एकूणच कर्मवीरांच्या शिक्षण कार्यावरती सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता असे विचार रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ.संदीप किर्दत यांनी व्यक्त केले ते डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव-सोनसळ येथे आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते जितेश भैय्या कदम होते. तर सोनहिरा सहकारी साखर कारखानाचे माजी चीफ केमिस्ट प्रकाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संदीप किर्दत पुढे म्हणाले की कर्मवीरांचे चरित्र विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रेरणादायी आहे. रयत मधील विद्यार्थी व शिक्षकांनी आण्णांनी कृतीतून दिलेली मूल्ये अंगिकारुन समाजात त्या मूल्यांचा प्रसार करायला हवा.दूरदृष्टीवान आण्णांनी प्रतिकूल परिस्थितीत वस्ततिगृहे, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ट्रेनिंग कॉलेज, डी.एड., बी.एड.कॉलेज व फ्री ॲन्ड रेसिडेन्सील कॉलेजेस सुरु केली . आजही रयत शिक्षण संस्था कर्मवीरांच्या विचारधारेनुसार बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. काळानुसार विद्यार्थी घडविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने सर्व शाखेत सर्व वर्गखोल्यांमध्ये इंटरेक्टिव्ह बोर्ड,ए.आय. शिक्षणासाठी कोर्स , संगणक शिक्षणासाठी लॅब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इ. मध्ये रयत शिक्षण संस्था प्रभावीपणे काम करीत आहे. आण्णांच्या विचारधारेनुसारच माजी विद्यार्थ्यांचा प्रभावीपणे सहभाग वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जितेश भैय्या कदम म्हणाले की कर्मवीरांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. पतंगराव कदम साहेब यांचे शिक्षण सुद्धा रयत शिक्षण संस्थेत झाले. 'कमवा व शिका' योजनेत शिकलेले पतंगराव कदम साहेब कधीही रयतला विसरले नाही. साहेबांनी रयतला भरभरून मदत केली. आजही रयतला भरभरून मदत करणाऱ्या लोकांच्या प्रति रयत नेहमी कृतज्ञ राहिली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवावी. यावेळी गणित प्रयोगशाळेचे व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विविध परीक्षेत व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच देणगीदारांचे सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश सावंत सर यांनी केले तर आभार शिंदे मॅडम यांनी मानले. सूत्रसंचालन ठोंबरे एस.एस. यांनी केले. यावेळी सरपंच सुप्रिया मांडके,माजी उपसरपंच सतीश मांडके, प्रा. हणमंत मांडके, माळी सर , डी.एम. वंजारी सर, पवार सर, जाधव सर यांचेसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या