विटा पोलिसांचा अजब कारभार; चोर सोडून वकिलाला नेले

विटा : विटा येथील पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्यावर एका नामांकित वकिलाला घरातून फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याचा आरोप आहे. एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी गुन्हेगाराला सोडून वकिलाला मारहाण करून नेल्याचा आरोप ॲड. विशाल कुंभार यांनी केला आहे. या घटनेमुळे विटा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री १२ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे आपल्यासोबत १२ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन कुंभार गल्लीत एका गुन्हेगाराच्या शोधात गेल्या होत्या. या वेळी ॲड. विशाल कुंभार यांच्या घरासमोर मोठा आवाज झाल्याने त्यांचे वडील प्रकाश कुंभार घराबाहेर आले. त्यांनी पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांच्यात वाद झाला आणि पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार पाहून ॲड. विशाल कुंभार घराबाहेर आले आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग सुरू केले. त्यांनी पोलिसांना रात्रीच्या वेळी शांतता राखण्यास सांगितले. यावर जयश्री कांबळे यांनी शिवीगाळ करून पोलिसांना ॲड. कुंभार यांना उचलून आणण्याचा आदेश दिला.

त्यानंतर पोलिसांनी कोणतेही वॉरंट किंवा परवानगी नसताना घरात घुसून ॲड. कुंभार यांना मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना जनावरांप्रमाणे फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

पोलीस स्टेशनमध्ये काय झालं?

ॲड. विशाल कुंभार यांना रात्री २ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. या दरम्यान, त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून त्यातील व्हिडिओही डिलीट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड विधान ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला.

३५४ कलमाचा गैरवापर?

ॲड. कुंभार यांनी या गैरकायदेशीर कृत्याबद्दल पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही आणि उलट त्यांना पुन्हा ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

साधारणपणे ३५४ कलम महिलांच्या विनयभंगासाठी वापरले जाते. अनेकदा पोलीस एखाद्याला विनाकारण त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काही अनैतिक हेतू साध्य करण्यासाठी या कलमाचा गैरवापर करतात, असा आरोपही या निमित्ताने पुढे येत आहे.

या घटनेमुळे विटा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर पुढील काळात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या