"मला बदनाम करण्याचे हे राजकारण":सदाशिवराव पाटलांनी सोडले मौन; विटा यात्रा कमिटी वादावर दिले स्पष्टीकरण

विटा (अमोल हत्तरगीकर) : खानापूर मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, पक्षांतरे, आरोप-प्रत्यारोप आणि विशेषतः विटा शहरातील जुन्या-नव्या यात्रा कमिटीचा वाद व आगामी नगरपालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज विटा येथे पत्रकार परिषद घेऊन आपले मौन सोडले. पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन करत, हे सर्व राजकारण आपल्याला बदनाम करण्यासाठीच सुरू असल्याचे ठामपणे सांगितले.

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन सुरू झालेल्या या पत्रकार परिषदेत सदाशिवराव पाटील यांनी प्रामुख्याने भैरवनाथ यात्रा कमिटी आणि मंगल कार्यालयाच्या वादावर विस्तृत स्पष्टीकरण दिले. "माझ्यावर आणि यात्रा कमिटीवर जे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप झाले, त्यांची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, जनतेला या सगळ्या प्रश्नांची पार्श्वभूमी माहीत असावी, यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे," असे पाटील म्हणाले. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याविषयी आणि यात्रा कमिटीबद्दल गैरसमज निर्माण करून, "आपले वैयक्तिक चारित्र्य हनन करून निवडणुकीत पोळी भाजून घेण्याचा" विरोधकांचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.

पाटील यांनी मंगल कार्यालयाच्या जागेच्या मूळ वाद आणि त्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला. ही जागा मूळतः त्रिंबकेश्वर देवस्थान आणि सीतारामचंद्र देवस्थानची असल्याचे सांगत, १९८२ साली कै. हनुमंतराव पाटील यांनी समाजाच्या हितासाठी बहुजन समाजाला मंगल कार्यालय मिळावे या उद्देशाने भैरवनाथ यात्रा कमिटीच्या नावाने ही जागा खरेदी केली. मात्र, कुळ कायद्याच्या नियमांचे पालन न केल्याने १९९२ साली ही ४५ गुंठे जागा सरकारजमा झाली.
"दरम्यानच्या काळात, कै. हनुमंतराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालयाचे काम पूर्ण केले होते," असे पाटील यांनी सांगितले. १९८८ पर्यंत मंगल कार्यालयाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले होते, परंतु १९९२ साली सरकारने ही जागा सरकारजमा केल्याने नवीन प्रश्न निर्माण झाला. हनुमंतराव पाटलांच्या निधनानंतर (१९९८) ही सरकारजमा झालेली प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केल्याचे सदाशिवराव पाटील म्हणाले. २००४ साली आपण आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा करून ही जागा परत मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.

पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालाचा संदर्भ दिला. या अहवालात मंगल कार्यालयात मुखबधिर शाळा विनामूल्य चालवली जात असल्याचे, मंगल कार्यालय कमी शुल्कात सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याचे आणि उर्वरित जागेत कै. हनुमंतराव पाटलांची समाधी व मंदिर असल्याचे नमूद केले होते. या अहवालाच्या आधारावर शासनाने निर्णय घेऊन २१ गुंठे जागा शैक्षणिक कामांसाठी मूल्यविरहित, ९ गुंठे जागा सामाजिक सभागृहासाठी मूल्यविरहित यात्रा कमिटीला दिली, तर उर्वरित १५ गुंठे जागा लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला ३० वर्षांसाठी २७ हजार रुपये वार्षिक भाड्याने मिळाली. अशाप्रकारे २००८ साली ही जागा परत आपल्या ताब्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रा कमिटीच्या वर्गणी गोळा करण्याच्या पद्धतीवर आणि पैशांच्या वापरावर होणाऱ्या आरोपांवरही पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, "यात्रा कमिटीच्या पावत्यांवर जमा झालेले सर्व पैसे दर एक तारखेला एफडीमध्ये ठेवले जातात. सध्या जवळपास ३८ लाख रुपये एफडीमध्ये आहेत आणि आमचे उद्दिष्ट एक कोटी रुपये जमा करण्याचे आहे. यातून मिळणाऱ्या व्याजातून यात्रा कमिटीची कामे आणि देखभाल केली जाते."

काही लोकांनी "नवीन यात्रा कमिटी" स्थापन करून गावात अनावश्यक तणाव निर्माण केल्याचा आरोप पाटील यांनी केला. "हे सर्व राजकारण आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीपासून ते आता आगामी नगरपालिका निवडणुकीपर्यंत मला एक पक्षप्रमुख म्हणून बदनाम करण्याचा हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून या सगळ्या गोष्टी होत आहेत," असे ते म्हणाले.
ते म्हणाले, "४० वर्षांपासून मी राजकारण करत आहे. विट्यातील लोकांनी मला स्वीकारले आहे. माझे चारित्र्य, मी केलेले काम, संस्थात्मक केलेले काम आणि विट्यासाठी दिलेले योगदान हे विटेकरांना माहीत आहे. त्यामुळे असल्या गोष्टींना मी भीक घालणार नाही." शहरातील काही "कायदे पंडित" आणि "सराईत तक्रारदार" अशा आरोपांमागे असल्याचे त्यांनी सूचित केले.

चार गुंठे तालीम जागेच्या वादावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ही जागा कै. हनुमंतराव पाटलांना बक्षीस पत्राने मिळाली होती, परंतु तिचा कधीच उपयोग झाला नाही. उलट आपण क्रीडा संकुलाच्या माध्यमातून उत्कृष्ट तालीम उभी केली आहे, असे त्यांनी सांगितले. तालीम जागेच्या संदर्भात झालेल्या खरेदी-विक्रीची नोंद पीटीआरला असल्याने त्यात चूक झाल्याचे मान्य करत, ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, कायदेशीर प्रक्रियेतून योग्य निर्णय येईल, असे ते म्हणाले.

"सरकार तुमचे आहे, अधिकारी तुमचे आहेत, मग गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक असताना तुम्ही नोंदी का केल्या नाहीत?" असा सवाल पाटील यांनी विरोधकांना विचारला. "मला बदनाम करण्यासाठीच हे सगळे सुरू आहे, पण या असल्या गोष्टीला मी भीक घालणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी, "देवाच्या पैशाला आम्ही कधी हात लावत नाही," असे सांगून, विट्यातील संस्था व्यवस्थित चालाव्यात आणि गावामध्ये शांतता राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, या पत्रकार परिषदेमुळे लोकांचा गैरसमज दूर होईल आणि त्यांचे प्रेम सदैव आपल्यासोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या