महाऑनलाइन पोर्टलच्या अडचणींवर आमदार सुहास बाबर यांचा विधानसभेत पाठपुरावा

विटा : राज्यातील महाऑनलाइन पोर्टलवर सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी आज विधानसभेत जोरदार पाठपुरावा केला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडत, प्रवेश प्रक्रियेतील अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सध्या राज्यात उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयांमधून डोमिसाईल, नॉन-क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला मिळवताना नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

आमदार बाबर यांनी मांडलेल्या या मुद्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. "नुसत्या टोकनवर देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल," अशी महत्त्वपूर्ण ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली. या पाठपुराव्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या