श्री भैरवनाथ नवीन यात्रा कमिटीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

विटा : येथील भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागेचा गैरवापर, यात्रा कमिटीच्या मालकीच्या मिळकतींमधून मिळणाऱ्या भाड्याचा वापर, आणि यात्रा कमिटीच्या जागांवर बांधलेल्या शैक्षणिक संस्थांमधील शुल्काबाबत अनेक प्रश्न नवीन यात्रा कमिटीने उपस्थित करत बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

या प्रश्नांमुळे विटा शहरातील नागरिकांची आणि यात्रा कमिटीची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.


भैरवनाथ मंगल कार्यालय जागेचा गैरवापर आणि भाड्याचा विनियोग. ४५ गुंठे क्षेत्रातील भैरवनाथ मंगल कार्यालय बंद करून ती जागा बालाजी फर्निचर आणि पाटील ऑटोमोबाईल यांना बेकायदेशीरपणे भाड्याने देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे विटेकर जनता आणि यात्रा कमिटीची आर्थिक फसवणूक होत आहे. या जागेतून मिळणारे भाडे कोणाला मिळते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे भाडे यात्रा कमिटीकडे जमा न होता, इतरत्र जात असल्याचा संशय आहे, ज्यामुळे आर्थिक अनियमितता समोर येत आहे.

लोकनेते हणमंतराव पाटील कला वाणिज्य महाविद्यालयात विट्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण का नाही? यात्रा कमिटीच्या ४५ गुंठ्यांपैकी १५ गुंठे जागा विनामोबदला लोकनेते हणमंतराव पाटील कला वाणिज्य महाविद्यालयासाठी वापरण्यात आली आहे. असे असतानाही विट्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात मोफत शिक्षण का दिले जात नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. जर यात्रा कमिटीने समाजाच्या हितासाठी जागा दिली असेल, तर त्याचा लाभ विद्यार्थ्यांना का मिळत नाही, याबाबत स्पष्टीकरण आवश्यक आहे.

यात्रा कमिटीच्या जागेतील मूकबधिर शाळा कुठे आहे? ४५ गुंठे क्षेत्रापैकी २१ गुंठे जागेत मूकबधिर शाळा प्रस्तावित होती किंवा असल्याचा उल्लेख आहे. मात्र, ही शाळा सध्या कुठे आहे, याबाबत माहिती उपलब्ध नाही. यात्रा कमिटीच्या जागेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी होत नसेल, तर त्यामागे काय कारण आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

मधुकमल इमारतीचा ताबा आणि आर्थिक गैरव्यवहार
श्री. लाटकर (तात्या) यांनी तालमीसाठी दिलेल्या जागेत उभारलेली मधुकमल इमारत यात्रा कमिटीच्या नावावर असूनही, ती अद्याप कमिटीच्या ताब्यात का नाही, हा एक गंभीर प्रश्न आहे. या इमारतीचे भाडे कोणाला मिळते आणि गेल्या १२ वर्षांपासून (अंदाजे १३ लाख २० हजार रुपये) येणारे लाईट बिल यात्रा कमिटी का भरत आहे, याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. ही रक्कम मोठी असून, जर इमारत ताब्यात नसेल तर तिचा खर्च यात्रा कमिटी का करत आहे, अशा अनेक प्रश्नांवरून नवीन यात्र कमिटीने जुन्या यात्रा कमिटीला घेराव घातला आहे. या प्रश्नांची उत्तरे विटेकर जनतेला मिळालीच पाहिजेत यासाठी नवीन यात्रा कमिटीने आज पासून (७ जुलै) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या धरणे आंदोलनात रणजीत पाटील, नगरसेवक अमर शितोळे, माजी नगरसेवक कृष्णा गायकवाड, समीर कदम, नगरसेवक अविनाश चोथे ,कन्हैया पवार, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदिवे , पाटील, अशोक सयाजीराव पाटील ,सुभाष मेटकरी ,पैलवान आलम तांबोळी, कैलास पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, अभिषेक कदम ,फिरोज शिकलगार, आयाज मुल्ला, राजू जाधव, विजय सपकाळ, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आप्पा पाटील, विलास बापू कदम, सुभाष आप्पा मेटकरी, नगरसेवक शिवाजी हारूगडे उपस्थित होते.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या