Vihann News
728x90 Ad Slot

होमगार्डसाठी खुशखबर, पगारात दुप्पट वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

ऑक्टोबर १२, २०२४

मुंबई : राज्यातील होमगार्ड्सचा दसरा राज्य सरकारने गोड केला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्डच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयाबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली असून त्यांनी राज्यातील सर्व होमगार्डना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

राज्यातील होमगार्ड्सच्या पगारात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील होमगार्डना इतर राज्यातील होमगार्डच्या तुलनेत सर्वाधिक पगार मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार, होमगार्ड्सचे मानधन दररोज ५७० रुपयांवरून थेट १ हजार ८३ रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात एकूण ११ हजार २०७ होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या गृहरक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणार्थी होमगार्डनाही नव्या निर्णयानुसार पगार मिळणार आहे. या होमगार्डना या दसऱ्याला एक प्रकारे भेटच मिळाली आहे. एकूण 55 हजार होमगार्डना या निर्णयाचा फायदा होणार आहे. 

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्डसबाबत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यातील होमगार्ड्सच्या पगारात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. 570 रुपये प्रतिदिन ते आता 1083 रुपये करण्यात आले आहे. आता हा पगार देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. भेट भत्ता 100 रुपयांवरून 200 रुपये आणि भोजन भत्ता 100 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.