विट्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामाचा उभारणीचा शुभारंभ
विटा /प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जतन करत सामाजिक समतेचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नेहरूनगर, विटा येथे उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ तसेच अभ्यासिकेचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी नगराध्यक्षा काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील,
बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ. शीतलताई बाबर, मनिषाताई बागल, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सुहासभैय्या बाबर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रखर योद्धे होते. त्यांच्या लेखणीतून, शाहिरीतून आणि संघर्षातून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या स्मृती जपणारा हा पूर्णाकृती पुतळा समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल," असे सांगितले.
नगरपालिका निवडणुकीवेळी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचे दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी, "दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला जाईल. पुतळा उभारण्याबरोबरच त्यांच्या नावाने अभ्यासिका सुरू व्हावी, हा माझा उद्देश आहे. स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी कटिबद्ध आहोत."याचवेळी विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी थेट उत्तर दिले. "कोणी कितीही टीका केली तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. विटा शहराचा चेहरामोहरा बदलण्याची भूमिका घेऊन सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे करत राहणार," असा ठाम निर्धार आमदार बाबर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याबरोबरच विटा शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार सुहासभैय्या बाबर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून पुतळा व चबुतऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन नेहरूनगर येथील आण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पुतळा समितीचे विश्वनाथ कांबळे, डॉ. राजन भिंगारदेवे, नगरसेविका प्रा. लीला भिंगारदेवे, रूपाली पाटील, वनिता शितोळे, उज्ज्वला पाटील, अपर्णा पाटील, दीपा चोथे, सपकाळ, भाग्यश्री तारळकर, शीला लिपारे, उज्वला सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक संजय भिंगारदेवे, रामचंद्र भिंगारदेवे, सुरेश पवार, भालचंद्र कांबळे, महेश कदम, श्रीकांत साळुंखे, प्रणव हारुगडे, अविनाश शितोळे, अमर शितोळे, अँड. धर्मेश पाटील, वैभव म्हेत्रे, सुरेश पवार, विशाल तारळेकर, प्रकाश सपकाळ, कन्हैया पवार, माजी नगरसेवक शिवाजी हारुगडे, महेश भिंगारदेवे, प्रकाश भिंगारदेवे, निखील भिंगारदेवे, कैलास भिंगारदेवे, भूषण भिंगारदेवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे सर यांनी केले. आभार रामचंद्र भिंगारदेवे यांनी मानले.