Vihann News
728x90 Ad Slot

भाळवणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या सेवाभावी नेतृत्वाची जोरदार चर्चा

जानेवारी १६, २०२६

भाळवणी (महादेव धनवडे) : खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच, भाळवणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते व ‘वरद विनायक सामाजिक संस्थेचे’ अध्यक्ष अमोल शिंदे यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी मतदारांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली असून, “सत्ता नव्हे सेवा हाच माझा मार्ग” ही भूमिका त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ठामपणे मांडली.

आरोग्यदूत म्हणून जनमानसात ओळख

गेल्या अनेक वर्षांपासून अमोल शिंदे हे आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात मोफत डोळ्यांचे ऑपरेशन, आरोग्य तपासणी शिबिरे, औषधांचे मोफत वाटप अशा उपक्रमांमुळे ते सर्वसामान्यांचे ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जातात.

मुलाखतीदरम्यान त्यांनी आळसंद येथील एका भावूक प्रसंगाचा उल्लेख केला. उपचारासाठी कुणीच पुढे नसलेल्या एका वृद्ध रुग्णाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांनी उपचारापासून ते पुनर्वसनापर्यंत मदत केली. “राजकारण हे माणुसकीपासून दूर नसावे,” असा संदेश त्यांच्या कामातून सातत्याने मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. याच सामाजिक बांधिलकीमुळे जनतेतूनच त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह वाढत आहे.

अनिलभाऊ बाबर यांच्या विचारांचा वारसा

स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विचारधारेशी निष्ठा राखत अमोल शिंदे राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते आमदार सुहास बाबर व अमोल दादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.

“अनिलभाऊंनी नेहमी सत्तेपेक्षा सेवेला प्राधान्य दिले. तोच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच त्यांचे राजकारण हे घोषणांपेक्षा कामावर आधारित असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

विकासाचा ‘अमोल’ आराखडा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी भाळवणी गटासाठी ठोस आणि वास्तववादी विकास आराखडा मांडला आहे.

शिक्षण: जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन करून स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देत त्या सीबीएसई शाळांच्या तोडीस तोड बनवण्याचा संकल्प।

महिला सक्षमीकरण: ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ, बचत गटांना प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ।

युवा व शेतकरी: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवकांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज, मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी।

आरोग्य: ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व आवश्यक सोयीसुविधा, लसीकरण व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता।

उमेदवारीबाबत ठाम विश्वास

भाळवणी जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक उमेदवार असले तरी, गेल्या ४–५ वर्षांतील सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि पक्षांतर्गत सर्वेक्षण यामुळे आपलेच नाव पुढे येईल, असा ठाम विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.

“मी केवळ निवडणुकीपुरते लोकांमध्ये गेलो नाही, तर चांगल्या-वाईट काळात त्यांच्या सोबत उभा राहिलो. त्यामुळे शिवसेना नेतृत्व माझ्यावर नक्कीच विश्वास टाकेल,” असे त्यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात चर्चा

अमोल शिंदे यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे भाळवणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेची बाजू अधिक भक्कम होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सेवा, विश्वास आणि विकासाच्या मुद्द्यांवर उभे असलेले त्यांचे राजकारण आगामी निवडणुकीत कितपत यश मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.