Vihann News
728x90 Ad Slot

भाळवणी जि.प गटात संजय धनवडे काँग्रेसकडून मैदानात?

जानेवारी १८, २०२६

खानापुरात काँग्रेस ‘रीचार्ज’! जि.प. व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याची शक्यता

भाळवणी (महादेव धनवडे) :

खानापूर तालुक्यातील मरगळलेल्या अवस्थेत असणाऱ्या काँग्रेसला चंद्रकांत बापू चव्हाण यांच्या रूपाने नवीन तालुकाध्यक्ष लाभला आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे कालच त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने तालुक्यातील जुने जाणते काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.

भाळवणीचा ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा सावरणार?

भाळवणी जिल्हा परिषद गट हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. नूतन तालुका काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची घोषणा केली आणि अनेक जण इच्छुक पुढे येऊ लागले आहेत.

संजय धनवडे काँग्रेसकडून मैदानात उतरण्यास इच्छुक

भाळवणी सोसायटीचे माजी चेअरमन असलेले संजय हिंदुराव धनवडे यांनी काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच ते काँग्रेस समितीकडे भाळवणी जिल्हा परिषद गटातून लढण्यासाठी उमेदवारीची मागणी करणार आहेत.

संजय हिंदुराव धनवडे हे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, स्वर्गीय यशवंतराव घोरपडे (काका), आमदार मोहन शेठ कदम, विश्वजीत कदम साहेब, शांताराम कदम, सांगलीचे सिकंदर जमादार यांच्याशी फार पूर्वीपासूनचे घनिष्ठ संबंध आहेत.

भाळवणी जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांमध्ये काँग्रेसच्या जुन्या शिलेदारांसोबत त्यांचे वैयक्तिक, राजकीय तसेच नातेसंबंधांचे मोठे जाळे आहे. यामुळे या गटात काँग्रेसची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत.