Vihann News
728x90 Ad Slot

भाळवणी जिल्हा परिषद गटात रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा

जानेवारी १५, २०२६

 

अशी संधी पुन्हा 20-25 वर्षानंतरच उपलब्ध होणार असल्याने इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग.

भाळवणी (महादेव धनवडे) : जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली. 16 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर 27 जानेवारी ही माघार घेण्याची तारीख आहे. भाळवणी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला असल्याने इच्छुकांनी आपापल्या वरिष्ठ नेत्याकडे उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे. सर्वसाधारण ओपन हा जिल्हा परिषदेचा गट झाल्याने आत्ता नाही तर कधीच नाही या इराद्याने प्रत्येक जण या मैदानात उतरला असून आता जर उमेदवारी आपल्याला मिळाली नाही तर त्यानंतर वीस पंचवीस वर्षे हे आरक्षण पडणार नसल्याने यावेळेसच उमेदवारी मिळवायची या इराद्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
भाळवणी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर व भाजपचे परंपरागत प्रतिस्पर्धी विट्याचे मा.नगराध्यक्ष वैभव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटात हा निवडणुकीचा सामना होणार आहे.
आमदार सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटातून जिल्हा परिषदेसाठी वरदविनायक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यापासून दंड थोपटले आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषद गटातील सर्व गावात गेल्या तीन वर्षापासून आपला संपर्क वाढवला आहे. व आरोग्य विषयक सेवा लोकांना दिल्या आहेत. जनतेतूनच आपल्या उमेदवारीस मोठे पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर शिवसेनेतून भाळवणीचे मा.पंचायत समिती सदस्य संजय मोहिते हे सुद्धा इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी वैभव पाटील गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य,भाळवणी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ही पदे त्यांनी भूषवली असल्याने प्रशासकीय कामकाजाचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. अमोल दादा बाबर यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने भाळवणी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा त्यांचा कयास आहे.
त्याचबरोबर आळसंदचे माजी सरपंच हिम्मतराव जाधव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या इराद्याणे उतरले असून आळसंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हे त्यांचे सुपुत्र आहेत. त्यांना सुद्धा प्रशासकीय कामकाजा बरोबरच जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा राजकीय दृष्ट्या मोठा अभ्यास असल्याने आपल्या उमेदवारांसाठी इतर गावातील राजकीय नेत्यांनी सहकार्य करावे यासाठी त्यांनी सध्या गाव भेट दौऱ्यावर प्रारंभ केला आहे. बाबर घराण्याशी त्यांचे फार पूर्वीपासून राजकीय संबंध आहेत.
तर दुसरीकडे वैभव दादा पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटातून भाजप पक्षाच्या वतीने आळसंदचे नितीनराजे जाधव यांनी दंड थोपटले असून संपूर्ण गटातील गावांमधून गाव भेट दौऱ्याची त्यांची एक फेरी पूर्ण झाली आहे. आळसंद ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या मातोश्री सरपंच होत्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी आळसंद मध्ये त्यांनी अनेक विकास कामांना न्याय दिला आहे. त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांचा त्यांचा मोठा अभ्यास असल्याने भाजपच्या गोटातून त्यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल त्या दृष्टीने त्यांनी भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर व विट्याचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील यांची गाठीभेटी घेऊन चर्चा केल्याचे समजते.
उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.आत्ता नाही तर कधीच नाही वीस ते पंचवीस वर्षे पुन्हा हे आरक्षण पडणार नसल्याची ही खात्री झाल्याने अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.