विटा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
विटा (प्रतिनिधी) : विटा शहरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विटा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती भालचंद्र भैय्या कांबळे तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक, लोकशाहीर आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून श्रमिक आणि शोषित वर्गाचे दुःख जगासमोर मांडले. त्यांच्या साहित्याने समाजातील अन्याय, विषमता आणि संघर्ष यांचे वास्तव दर्शन घडवले.
ते पुढे म्हणाले की, १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जयंतीचा दिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून घोषित करून त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी विटा नगरपरिषद आरोग्य विभागातील आयईसी विभागप्रमुख नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्य व कार्याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, आयईसी विभागप्रमुख नितीन चंदनशिवे, समन्वयक महेश झाडे, आकाश कदम यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

