Vihann News
728x90 Ad Slot

हवी तेवढी मदत देतो! रोहित पाटलान विरोधात अजितदादांची फिल्डिंग

ऑक्टोबर २१, २०२४


सांगली: विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या लेकाचा पराभव करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फिल्डींग लावली आहे. शरद पवारांच्या पक्षात असलेल्या रोहित पाटील यांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची मदत मागितली आहे. कवठे महाकाळ तहसीलला विकासनिधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन अजित पवारांकडून घोरपडे यांना देण्यात आलं आहे. तुम्हाला मानाचं स्थान देऊ, असा शब्दही पवारांकडून देण्यात आला आहे.

रोहित पाटील शरद पवार गटाकडून तासगाव कवठे महाकाळची जागा लढवतील हे जवळपास स्पष्ट आहे. याआधी त्यांच्या आई सुमन पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळची आमदारकी भूषवली आहे. सुमन पाटील विद्यमान आमदार आहेत. ही जागा जिंकण्यासाठी माजी खासदार आणि भाजपचे नेते संजयकाका पाटील यांच्याशी अजित पवारांनी संपर्क साधला. रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी अजित पवार अनेकांची मदत मागताना दिसत आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडेंना दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. एक तर तुम्ही उमेदवार निवडा किंवा मग संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना निवडणूक लढवू, असे ते दोन पर्याय आहेत. तुम्ही ज्याला उमेदवार कराल, त्याला पाठिंबा देऊ, असा शब्दच संजय काका पाटील यांनी घोरपडे यांना दिला आहे.

घोरपडेंनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांच्याविरोधात काम केलं होतं. दोन टर्मचे खासदार असलेल्या पाटील यांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी पराभव केला. तिरंगी लढतीत विशाल पाटील निवडून आले. घोरपडेंनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते सुमन पाटील यांच्याविरोधात लढले. त्यांनी ८५ हजार मतं घेतली. पण त्यांचा पराभव झाला.