नेव्हिगेशन मेनू

Pune Crime News : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळल्या; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर ११, २०२४

 


पुणे | Pune 

पुण्यातील बोपदेव घाट येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला. दरम्यान, तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या तिघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 60 पथके तयार केली आहेत. आठवडा उलटूनही आरोपी फरार असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पोलीस तपासाबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. शिवाय आरोपींच्या माहितीसाठी 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करत होते. परंतु मोबाईल फोनची रेंज नसणे आणि सुमारे दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली. यानंतर बोपदेव घाटातील सासवड बाजूला तीन संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या तरुणीवर मारहाण करण्यात आली होती. तिच्या मैत्रिणीलाही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना आता यश आले आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येत आहे. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे.