Vihann News
728x90 Ad Slot

बसखाली चिरडून विद्यार्थिनीचा मृत्यू

जून २६, २०२५
सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अपघातात २१ वर्षीय शर्वरी राजकुमार कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज (गुरुवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर घडली.
शर्वरी, जी हरिपूर येथील रहिवासी होती आणि सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती, ती आपल्या मैत्रिणींसोबत कॉलेजला सुट्टी असल्याने दंडोबाकडे सहलीला निघाली होती. मिरजेच्या दिशेने जात असताना सिव्हिल रोडवर तिची दुचाकी एका मुंबई-जमखंडी एसटी बसला घासली. यामध्ये शर्वरी एसटीच्या मागील चाकाखाली सापडली आणि तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर बस काही अंतरावर जाऊन थांबली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शर्वरीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शर्वरीचे वडील हयात नाहीत; ती हरिपूर येथे तिच्या आई आणि बहिणीसोबत राहत होती.