Vihann News
728x90 Ad Slot

विटा पालिकेत आता २६ नगरसेवक, नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार

जून २४, २०२५
विटा : विटा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढणार आहेत, ज्यामुळे एकूण १३ प्रभागांतून २६ नगरसेवक निवडले जातील. नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. सध्या विटा पालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच प्रमुख लढत अपेक्षित आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, विटा पालिका हद्दीची लोकसंख्या ४८,२८९ आहे. यानुसार, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४ नगरसेवक (त्यापैकी २ महिला) आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ७ नगरसेवक (त्यापैकी ४ महिला) आरक्षित असतील. एकूण २६ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव असतील, तर ८ नगरसेवक सर्वसाधारण प्रवर्गातून असतील. प्रत्येक प्रभागाची अंदाजे लोकसंख्या ३,७१५ असेल.
प्रशासकीय पातळीवर प्रभाग रचनेचे काम सुरू असून, ४ जुलै ते १० जुलै दरम्यान गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार केले जातील. १८ ते २४ जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार होईल आणि २९ जुलैपर्यंत तो नगरविकास विभागास सादर केला जाईल. अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल अशी अपेक्षा आहे.