Vihann News
728x90 Ad Slot

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून; पती फरार

जून २६, २०२५

सांगली : सांगली शहरातील विजयनगर येथील शाहूनगर येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. शिलवंती पिंटू पाटील (वय ३६, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव असून, पिंटू तुकाराम पाटील (वय ४०, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा) असे फरार झालेल्या संशयित पतीचे नाव आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके सोलापूर जिल्ह्यात रवाना झाली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पाटील दांपत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर येथे मजुरीसाठी वास्तव्यास होते. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून, विशेषतः पिंटू पत्नी शिलवंतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वारंवार भांडणे होत होती.
मंगळवारी (२४ जून) रोजी देखील त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर शिलवंती झोपेत असताना, पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली. यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, पिंटू दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
बुधवारी (२५ जून) घटनेची माहिती मिळताच, संजयनगरचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर पिंटूनेच शिलवंतीचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ संशयित पिंटूच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके पाठवली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.