सांगली, दि. १२ : सातारा जिल्ह्यातील भुईज पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास सराफ व्यापारी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करून २० लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला सांगली पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद केले आहे. या घटनेमुळे सांगली पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास भुईज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ ते १० अज्ञात इसमांनी सराफ व्यापाऱ्याची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील २० लाख रुपयांची रोख रक्कम लुटून सांगलीच्या दिशेने पलायन केले. सातारा नियंत्रण कक्षाकडून सांगली नियंत्रण कक्षाला याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य ओळखून, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ पथके तयार करून तपासाची सूत्रे हाती घेतली.
दरोडेखोरांनी वापरलेल्या मोटारकारचा पोलिस पथक आणि फिर्यादीचे मित्र पाठलाग करत असताना, पो.हे.कॉ. उदय साळुंखे आणि पो.हे.कॉ. सागर टिंगरे यांना माहिती मिळाली की, योगेवाडीजवळ आरोपींच्या कारला अपघात झाला असून, ते कार सोडून डोंगरवाटेने पळून गेले आहेत.
या माहितीनंतर LCB चे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता, विनीत राधाकृष्णन (वय ३०, रा. पलाकाड, केरळ) नावाचा एक संशयित आरोपी लपलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपले साथीदार डोंगरातून पळून गेल्याचे आणि हा दरोडा त्यांनी मिळून टाकल्याची कबुली दिली.
ताबडतोब आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्ह्यात वापरलेल्या मोटारकारसह भुईज पोलिस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास भुईज पोलिस ठाणे, सातारा हे करत आहेत.
विशेष म्हणजे, पकडलेला आरोपी विनीत राधाकृष्णन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर महामार्गावर दरोडा टाकण्याचे गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवघ्या तीन तासांत एका मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश झाला आहे.

0 टिप्पण्या