विटा : विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अमोल अनिलभाऊ बाबर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक सत्तांतर घडवत नगराध्यक्ष पदासह २२ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीसाठी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली.
उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांचेच अर्ज दाखल झाले होते. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी श्रीमती उज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हारगुडे व अविनाश रमेश शितोळे यांची नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. इतर कोणतेही अर्ज न आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नूतन उपनगराध्यक्ष अमोल बाबर म्हणाले की, पक्षातील जेष्ठ नेते व नगरसेवकांच्या आग्रहामुळे ही जबाबदारी स्वीकारली आहे. विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर नूतन उपनगराध्यक्ष अमोल बाबर तसेच स्वीकृत नगरसेवक श्रीमती उज्वला पाटील, प्रणव हारगुडे व अविनाश शितोळे यांचा आमदार सुहास बाबर आणि नगराध्यक्षा काजल म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, धर्मेश पाटील, कृष्णात गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, नगरसेविका रूपाली मेटकरी, रूपाली पाटील, वनिता शितोळे, लीला भिंगारदेवे, प्रीती पवार, अपर्णा पाटील, दीपा चोथे, रसिका सपकाळ, भाग्यश्री तारळकर, शीला लिपारे, उज्वला सूर्यवंशी, विनोद गुळवणी, वैभव म्हेत्रे, महेशदाजी कदम, भालचंद्र कांबळे, रोहित पाटील, श्रीकांत साळुंखे, विशाल तारळेकर, सुरेश पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.