Vihann News
728x90 Ad Slot

आयकर आयुक्त सचिन मोटे यांच्यावर अट्रॉसिटी दाखल

जून ०२, २०२६

विटा : आयकर आयुक्त (IRS) अधिकारी सचिन बिरा मोटे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकावर विटा पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया तालुका प्रमुख विकास अनिल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विकास अनिल कांबळे (रा. बेनापूर, ता. खानापूर) यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयआरएस अधिकारी सचिन बिरा मोटे (रा. विभूतवाडी) आणि अक्षय अर्जुन (रा. अर्जुनवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी विकास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत, त्यांच्या आईच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतरच्या नियमित तपासणीसाठी ते ३० मे २०२६ रोजी सायंकाळी भिवघाट येथील सिद्धिविनायक सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

आईची तपासणी झाल्यानंतर कांबळे हे हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी संशयित अक्षय अर्जुन याने कांबळे यांना डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. कांबळे केबिनमध्ये गेले असता तिथे आयआरएस अधिकारी सचिन मोटे आणि इतर काही व्यक्ती उपस्थित होत्या.

केबिनमध्ये गेल्यानंतर सोशल मीडियावरील एका पोस्टच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादादरम्यान आयकर आयुक्त अधिकारी सचिन मोटे यांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि गंभीर धमकी दिली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर विकास कांबळे यांनी विटा पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आयआरएस अधिकारी सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन यांच्याविरुद्ध अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.