Vihann News
728x90 Ad Slot

विटा शहरात 100% प्लास्टिक बंदी

जुलै ०८, २०२६

अनधिकृत प्लास्टिक बाळगल्यास होणार दंडात्मक कारवाई : मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील : विटा नगरपरिषदेचे शहरात प्लास्टिक बंदीचे पथक तैनात 


विटा (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विटा नगरपरिषदेकडून शहरात सिंगल-यूज प्लास्टिकवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी शहरात 100% प्लास्टिक बंदी चा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना बळ मिळणार आहे.

नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल साहित्य, प्लास्टिक कप, प्लेट्स आदी वस्तूंचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला आहे. याबाबत व्यापाऱ्यांना व नागरिकांना पूर्वसूचना जनजागृती व लेखी नोटीस देऊन देण्यात आली असून पर्यायी उपाय म्हणून कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि इतर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासन वन व पर्यावरण विभागाचे प्लास्टिक वेस्ट (व्यवस्थापन हाताळणी) सुधारीत नियम २०११ अन्वये व महाराष्ट्र शासन विघटनशील कचरा (नियंत्रण) अध्यादेश २००६, आर.आर/१५२१/२०१४ दिनांक १८/११/२०१४ व महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना, २०१८ दि.२३/३/२०१८ चे आदेशानुसार प्लास्टिक, नॉनओवन पिशव्यांचे तसेच प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, द्रोण, चमचे तसेच शासनाच्या अधिनियमानुसार बंदी असलेले प्लास्टिक साहित्य इत्यादींचा उत्पादन करणे, साठा करणे, विक्री करणे व बाळगणे नियमानुसार दंडनीय गुन्हा आहे.

     शासनाच्या अधिनियमानुसार बंदी असलेले प्लास्टिक साहित्य इत्यादींचा वापर होत असलेचे दिसून आल्यास प्रथम वेळेस र.रू.५०००/-, व्दितीय वेळेस र.रू.१००००/- व तृतीय वेळेस र.रू.२५०००/- व ३ महिने कारावास व अधिनियमानुसार कारवाई प्रस्तावीत करणेचा कटू निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट केले आहे.

विटा नगरपरिषदेने आरोग्य-आयईसी विभागाच्यावतीने प्लास्टिक बंदी पथक नितीन चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तैनात केले आहे. या पथकाद्वारे शहरातील दुकाने, बाजारपेठ इत्यादी ठिकाणी स्पॉट व्हिझिट देऊन प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पथकाकडून शहरात नियमित तपासणी मोहीम राबवली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी प्लास्टिकऐवजी पर्यायी साधनांचा वापर सुरू केला आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी, व्यवसायिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे.असे आवाहन पालिकेने केले आहे.