नेव्हिगेशन मेनू

विट्यात विद्यार्थी व नागरिक रस्तावर; तहसीलदारांना निवेदन देऊन नोंदवला तीव्र निषेध

sbmarathi By sbmarathi
| जुलै २४, २०२६

 

विटा (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनी व आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद विटा शहरात उमटले. या दडपशाहीच्या निषेधार्थ विटा शहरातील विद्यार्थी, नागरिक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांचा जोरदार निषेध केला.

निषेध मोर्चाची सुरुवात कराड रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून झाली. "इंकलाब जिंदाबाद", "भारत माता की जय" आणि "शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्या" अशा जोरदार घोषणाबाजीने विटा शहर दणाणून गेले. कराड रोड व दगडी पाण्याच्या टाकीमार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. तेथे आंदोलकांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काही काळ ठिय्या आंदोलन केले.

त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकून तहसीलदार योगेश्वर टोपे यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. नीट पेपरफुटी आणि शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.दिल्लीत विद्यार्थिनी व आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरण आणि नीट परीक्षा गैरव्यवहाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. या मागण्या निवेदनात केल्या आहेत. 

या आंदोलनात ॲड. सुभाष पाटील, ॲड. सुभाष पवार, पंकज दबडे,  निखिल सुतार, शंकर मोहिते, सुनील सुतार, शिवाजी शिंदे, संपतराव पवार, ॲड. शौर्या पवार, संदीप ठोंबरे, दत्तात्रय गायकवाड, प्रताप सुतार, साजिद आगा, ॲड. नानासाहेब पाटील, राज लोखंडे, विवेक भिंगारदेवे, अरुण धेंडे, विकास पवार, अतुल भिसे, विकास जाधव, प्रवीण जगताप, ॲड. इकराम बागवान, प्रसाद लिपारे, विजय सपकाळ, हनुमंत पाटील, समीर कदम, बच्चू नागराळे, नवनीत लोंढे, असलम मुल्ला यांसह विविध राजकीय, सामाजिक व विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.