दैनंदिन कामाचा घेतला आढावा : समन्वयक टीमचे कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
विटा प्रतिनिधी :
विटा नगरपरिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सौ. काजल काकी म्हेत्रे यांनी विटा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत माहिती, शिक्षण व जनजागृती (IEC) विभागाला सदिच्छा भेट देऊन विभागाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली विभागप्रमुख नितीन चंदनशिवे हे अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. यावेळी आरोग्य विभाग अंतर्गत आयईसी विभागामार्फत शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता जनजागृती, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे, स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जनसहभाग वाढविणे तसेच विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती नगराध्यक्षा सौ. काजल काकी म्हेत्रे यांनी जाणून घेतली.
आरोग्य विभाग अंतर्गत आयईसी विभागाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधून स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. “शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून IEC विभागाने केलेले जनजागृतीचे काम कौतुकास्पद आहे. यापुढेही अशाच उत्साहाने व प्रभावीपणे काम करून विटा शहराला स्वच्छ, सुंदर व आदर्श शहर बनविण्यासाठी योगदान द्यावे,” अशा शुभेच्छा त्यांनी विभागाच्या सर्व टीमला दिल्या.
यावेळी आरोग्य आयईसी विभाग प्रमुख नितीन चंदनशिवे, सुपरवायझर अभी गायगवळे, समन्वयक प्रमोद भोसले, सुरज मंडले,आकाश कदम, महेश झाडे, विजय चंदनशिवे, अभिजित ममदापूरे यांच्यासह आयईसी विभागातील कर्मचारी व अन्य उपस्थित होते
