राष्ट्रध्वजाबद्दल आदर व देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
विटा प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा मोहीम 2026 अंतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विटा नगरपरिषदेच्या वतीने ‘सेल्फी विथ तिरंगा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या मार्गदर्शनखाली नगराध्यक्षा सौ.काजलताई म्हेत्रे,उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यावतीने हा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.
नगरपरिषद परिसरात आकर्षक तिरंगा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांनी कुटुंबीय व मित्रांसोबत तिरंग्यासोबत सेल्फी घेत देशभक्तीची भावना व्यक्त केली. अनेक नागरिकांनी ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून ‘हर घर तिरंगा’चा संदेश पोहोचविला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे म्हणाल्या की, स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिरंगा हा आपल्या देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. ‘सेल्फी विथ तिरंगा’सारख्या उपक्रमामुळे विशेषतः युवा पिढीमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेमाचा संदेश पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तिरंग्यासोबत सेल्फीची क्रेझ
नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर नागरिकांनी उत्साहाने छायाचित्रे घेतली. अनेक कुटुंबांनी एकत्रितपणे तिरंग्यासोबत सेल्फी घेत स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला. युवकांनीही या उपक्रमाला विशेष प्रतिसाद देत सोशल मीडियावर तिरंग्यासोबतची छायाचित्रे प्रसारित केली. शहरात देशभक्तीमय वातावरण ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमामुळे विटा शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. ‘तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहे,’ हा संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेच्या सर्व विभागातील सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

