नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
विटा प्रतिनिधी :
विटा नगरपरिषद येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि देशाच्या विकासासाठी आपली जबाबदारी निश्चित करण्याचा आजचा दिवस आहे.आपण एक जागृत नागरिक या नात्याने राष्ट्र हिताचे कार्य करू.तसेच स्वच्छ,
सुंदर, हरित आणि विकसित विटा घडविण्यासाठी आपण एकसंघपणे काम करू असे प्रतिपादन केले.
उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदान आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या तरुण पिढीने स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेत राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा.तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि शहराचा नियोजनबद्ध विकास यांना प्राधान्य देण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपरिषद परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी देशभक्तीपर सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





