नेव्हिगेशन मेनू

‘एक रविवार गावासाठी’ उपक्रमातून युवकांची गावाच्या विकासासाठी एकजूट

Pramod Bhosale By Pramod Bhosale
| ऑगस्ट १६, २०२६


माझा गाव, माझा अभिमान’ व्हॉट्सॲप ग्रुपचा पुढाकार; पहिल्याच रविवारी मारुती मंदिर परिसराची स्वच्छता


विटा प्रतिनिधी 

गावाच्या विकासात युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा, तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुंदर राहावीत, या उद्देशाने ढवळेश्वर ता.खानापूर येथील युवकांनी एकत्र येत ‘माझा गाव, माझा अभिमान’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून युवकांनी ‘एक रविवार गावासाठी’ ही अभिनव संकल्पना हाती घेतली असून, दर रविवारी एकत्र येऊन गावासाठी विधायक काम करण्याचा निर्धार केला आहे.








या उपक्रमाचा पहिला रविवार उत्साहात पार पडला. पहिल्याच दिवशी युवकांनी गावातील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता केली. मंदिर परिसरातील साचलेला कचरा, अनावश्यक गवत तसेच इतर घाण काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचा आदर्श निर्माण केला आहे. ‘माझा गाव, माझा अभिमान’ या भावनेतून स्वच्छता, वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, सामाजिक जनजागृती यांसह विविध विधायक उपक्रम राबविण्याचा मानस युवकांनी व्यक्त केला आहे.


दर रविवारी काही वेळ गावासाठी देऊन गाव अधिक स्वच्छ, सुंदर व आदर्श करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. युवकांच्या या उपक्रमामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अधिकाधिक युवक व ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी होतील, असा विश्वास उपक्रमाचे मुख्य संयोजक प्रा.शरद सकटे सर यांनी व्यक्त केला.


गावासाठी वेळ देण्याची सुरुवात एका रविवारपासून झाली असून, ‘एक रविवार गावासाठी’ ही संकल्पना सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.


या उपक्रमास प्रा. शरद सकटे सर, संदीप देशमुख सर, सरपंच प्रतिनिधी राहुल मंडले, कृष्णत आबा जाधव, विनायक किर्दत, सचिन किर्दत, सुभाष आप्पा किर्दत, भिकाजी गुरव, हनुमंत किर्दत, आनंद निंबाळकर,विजय जाधव,मल्हारी मंडले,सोमनाथ कांबळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.