विटा प्रतिनिधी
कै. कृष्णा एकनाथ कदम सेवाभावी संस्था, विटा यांच्या वतीने आज दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले प्रथमोपचार किटचे बॉक्स मोफत देण्यात आले. या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अचानक उद्भवणाऱ्या किरकोळ दुखापती अथवा आरोग्यविषयक प्रसंगी तातडीने प्राथमिक उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कै. कृष्णा एकनाथ कदम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विटा शहरासह पंचक्रोशीतील विविध भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत सेवा, त्यांच्या जेवणाचा खर्च तसेच औषधोपचारासाठी आवश्यक असणारी मदतही संस्थेकडून केली जाते.
याबाबत विटा नगरपरिषद शिक्षण समितीच्या सभापती डॉ. सौ. लीला रामचंद्र भिंगारदेवे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “कै. कृष्णा एकनाथ कदम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विटा व पंचक्रोशीतील गरजू नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना सातत्याने विविध प्रकारची मदत केली जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे तसेच रुग्णांना जेवण, औषधोपचार आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था अनेक वर्षांपासून करीत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा अथवा प्रसिद्धी न घेता संस्थेचे हे सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे. शाळांना प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्याचा आजचा उपक्रमही निश्चितच कौतुकास्पद आणि समाजोपयोगी आहे.”
शाळांमध्ये प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळताना, उपक्रमांमध्ये सहभागी होताना अथवा दैनंदिन शालेय वेळेत किरकोळ दुखापत झाल्यास तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, या उद्देशाने संस्थेने केलेली ही मदत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी कै. कृष्णा एकनाथ कदम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. विशाल कदम, विटा नगरपरिषद आरोग्य समितीचे सभापती मा. भालचंद्र कांबळे, नगरसेवक महेश दाजी कदम, महेंद्र कदम, रामअण्णा भिंगारदेवे तसेच विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील विविध शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
