जिल्हा परिषद सदस्या व मा. सभापती सौ. मनिषाताई बागल व युवानेते प्रकाशभाऊ बागल यांचेवतीने आयोजन; सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष महत्त्व
विटा प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणाला सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी निसर्ग फाउंडेशन, लेंगरे यांच्या संयोजनातून लेंगरे येथे प्रथमच जिल्हा परिषद सदस्या व खानापूर पंचायत समितीच्या मा. सभापती सौ. मनिषाताई बागल व युवानेते प्रकाशभाऊ बागल यांचेवतीने ‘घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला असून, गावातील जास्तीत जास्त कुटुंबांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹9000/- व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी ₹5000/- व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकासाठी ₹3000/-व ट्रॉफी उत्तेजनार्थ 1 ₹1000/- व ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थ 2 ₹1000/- व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धा केवळ लेंगरे गावापुरती मर्यादित असून, सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. घरगुती गौरी-गणपतीची सजावट ही स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांनी केलेली असणे आवश्यक आहे. सजावटीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पना तसेच सामाजिक संदेशाला विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
सहभागी कुटुंबांनी केलेल्या सजावटीचे तसेच राबविलेल्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे फोटोसह माहिती निसर्ग फाउंडेशनकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणीचा कालावधी २४ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ असा आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी श्री. सौरभ मंडलिक, SM आपले सरकार सेवा केंद्र, हनुमान चौक, लेंगरे येथे संपर्क साधावा.
संपर्क : ८४८४९६१०७३ / ७२७६४३२१४० / ९८६०६०९९७३
लेंगरे गावात प्रथमच अशा स्वरूपाच्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन होत असून, गणेशोत्सव अधिक सामाजिक, पर्यावरणपूरक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्याबरोबरच प्रत्येक घरातील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी विनामूल्य प्रवेश घेऊन या अभिनव स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली व संस्थेचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम, सहकार्यवाह मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, सल्लागार प्रा. संजय ठिगळे, प्रा. आप्पासाहेब बागल, सुनील पाटील, कार्याध्यक्ष नवनाथ सगरे, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, उपाध्यक्ष डॉ. वैशाली हजारे, खजिनदार भगवान जाधव, प्रमोद भोसले, सुरज मंडले, अभि गायगावळे, जीवन धेंडे, प्रतिक्षा जाधव व सुवर्णा मंडलिक यांचे सहकार्य लाभत आहे.
‘भक्तीबरोबर सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा लेंगरेच्या गणेशोत्सवाला नवा सामाजिक, पर्यावरणपूरक आणि सर्जनशील आयाम देणारी ठरणार आहे.
