दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेचे खजिनदार भगवानराव जाधव यांचा उपक्रम
विटा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम निसर्ग फाऊंडेशन संस्थेच्या वतीने राबविण्यात आला आहे. संस्थेचे खजिनदार श्री भगवानराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतःच्या हस्ते शाडू मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशाची सुंदर मूर्ती साकारून हरित गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
निसर्ग फाऊंडेशन ही संस्था पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनजागृतीसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याच परंपरेचा भाग म्हणून भगवानराव जाधव यांनी यंदाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडू माती व नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली. या मूर्तीमुळे जलप्रदूषण टाळण्यास मदत होत असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही हातभार लागतो.
गेल्या अनेक वर्षांपासून भगवानराव जाधव पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून अनेकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा स्वीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यंदाचा गणेशोत्सव हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी, नैसर्गिक सजावटीला प्राधान्य द्यावे आणि पर्यावरणपूरक विसर्जन करावे, असे आवाहन निसर्ग फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.





