दिपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रति लाभार्थी ४ हजार ५०० रुपये; सोमवारी नगरपरिषद सभागृहात होणार निधीचे वितरण
विटा प्रतिनिधी :
विटा शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींना आर्थिक आधार देऊन त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची दीपावली गोड करण्यासाठी विटा नगरपरिषदेच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४०२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १८ लाख ९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (अनुदान) मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचे वितरण सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विटा नगरपरिषद सभागृहात करण्यात येणार आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. काजल काकी म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, महिला व बालविकास सभापती सौ. अपर्णाताई पाटील, उपसभापती सौ. शिलाताई लिपारे आणि मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह सर्व सभापती नगरसेवक, नगरसेविका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत
नगरविकास विभागाच्या दिनांक २८ ऑक्टोबर २०१५ व १० मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी किमान ५ टक्के निधी राखून ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार विटा नगरपरिषदेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी दिव्यांग कल्याण निधीची तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ४०२ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे १८ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हातभार लागावा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दिव्यांग लाभार्थीनी सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विटा नगरपरिषद सभागृह येथे उपस्थित राहून मंजूर अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. काजल काकी म्हेत्रे यांनी केले आहे.
