Vihann News
728x90 Ad Slot

पालखी शर्यतीच्या थरारामध्ये सलग दुसऱ्या वर्षी विट्याच्या पालखीने मारली बाजी

ऑक्टोबर १३, २०२४


विट्याच्या दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या दसरा पालखी शर्यतीत सलग दुसऱ्या वर्षी विट्याची पालखी जिंकली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक दसरा पालखी शर्यत पार पडली. ही शर्यत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. हा दसरा पालखीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकां सह तालुक्यातील देशभर पसरलेले गलाई व्यवासायिक आले होते.

येथील गांधी चौकातील काळेश्वर मंदिर ते खानापूर नाक्यावरील सिमोल्लंघन मैदाना पर्यंतच्या रस्त्यावर लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शर्यत मार्गाच्याशेजारील इमारतींवर उभा राहून नागरिक शर्यतीचा आनंद घेतला. पालखी शर्यतीच्या निमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज दसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शर्यत सुरू झाली. तत्पूर्वी येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळील मैदानात विटा येथील रेवणसिद्ध आणि श्रीक्षेत्र मुळस्थानच्या श्री रेवणसिद्ध नाथाच्या पालख्या आल्या. यावेळी विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ, सिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या. काळेश्वर मंदिरा जवळ एकत्रित सर्व पालख्यांतील श्रींच्या मूर्त्यांची आरती करण्यात आली त्यानंतर विटा आणि मूळस्थान या दोन पालख्यांमध्ये शर्यत झाली. सुरुवातीपासूनच दोन्ही पालख्या एकमेकांना खेटून होत्या. दोन्ही बाजूचे समर्थक आपल्या पालखीसाठी धावत होते. दगडी पाण्याच्या टाकीपासूनच्या टप्प्यात विट्याची पालखी पुढे होती. 

कराड रस्त्याला व्यापारी संकुला समोर मूळस्थान ची पालखी बराच वेळ दाबण्यात आली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक पार करून विट्याची पालखी मूळस्थानच्या पालखीच्या बरेच पुढे गेली. सुरुवातीपासूनच पालख्यांची आडवा आडवी सुरू होती. 

विट्या ची पालखी पुढे निघून गेल्यानंतर मूळस्थानची पालखी पाठीमागून तितक्याच जोमाने पुढे आली. यानंतर स्टँड परिसरात विट्याच्या पालखी डिव्हायडरवर दाबून धरली. त्यामुळे मूळस्थांची पालखी विट्याच्या पालखी जवळ आली. तिथून थोड्या अंतराच्या फरकाने शर्यत चालू होते. नंतर साई हॉस्पिटल जवळ विट्याच्या तरुणांनी मूळस्थानची पालखी पुन्हा रोखून धरली. त्यामुळे दोन्ही पालख्यांमध्ये पुन्हा मोठे अंतर पडले. तरीदेखील सुळेवाडीतील तरुणांनी मोठी मुसंडी मारत पालखी पुढे आणली. यानंतर मार्केट यार्ड जवळ सुळवाडीतील तरुणांनी विट्याची पालखी दाबून धरत रस्त्याच्या खाली नेली त्यामुळे सुळेवडीची पालखी पुढे गेली. परंतु अंतिम वळणावर विट्याच्या तरुणांनी मूळ स्थानाची पालखी रोखून धरली. यात बराच वेळ चाललेल्या झटापटीमध्ये दोन्ही बाजूच्या तरुणांनी पोलिसांचा मार देखील खाल्ला. विट्यातील तरुणांनी जोपर्यंत आपली पालखी पुढे जात नाही तोपर्यंत सुळेवाडीची पालखी रोखून धरल्यामुळे विट्याची पालखी पुन्हा मुसंडी मारत पुढे आली. विट्या ची पालखी सर्वात आधी शिलांगण मैदानावर पोहोचली आणि ही पालखी शर्यत जिंकली.


त्यानंतर श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत श्री भैरवनाथ, श्री खरसुंडी सिद्धनाथ आणि श्री म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या सवाद्य मिरवणुकीने सिमोल्लंघन मैदानावर दाखल झाल्या. 'नाथबाबाच्या नावानं चांगभलं' असा जयजयकार करीत भाविकांनी आरती झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. एकमेकांना सोन्याची देवाण-घेवाण करीत विजयादशमीचा आनंद लुटला.

ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळ्याची क्षणचित्रे
छाया: समर्थ फोटो लॅब, विटा










निस्सीम श्रद्धा असलेली विट्याची पालखी शर्यतिची माहिती...

विजयादशमीनिमित्त आयोजित पालखी शर्यत सोहळा मूळ स्थान आणि विटा येथील श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीत होतो. या शर्यतीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पालख्या एकाच देवतेच्या म्हणजेच श्री रेवणसिद्धाच्या असतात. पालखी पळवणारे शर्यत जिंकतात किंवा हरतात; पण देव कधीच हरत नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर दोन्ही पालख्यांची आरती केली जाते. काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्यांचे आगमन होते. पाहुणे असल्याने मूळ ठिकाणच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान आहे.

काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालखींची आरती झाल्यानंतर पालखी शर्यत सोहळ्याला सुरुवात होते. शर्यतीसाठी पालख्या सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाला आहे. आरतीनंतर मूळ ठिकाणची पालखी पळविण्यासाठी उजव्या बाजूला सुळेवाडीकर (रेवानगरकर) सज्ज असतात. तर डाव्या बाजूला विटेकर पालखी पळवण्यासाठी सज्ज असतात. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक उपस्थित असतात. विट्याची पालखी पळवण्याचा मान शितोळे, गायकवाड, कदम, पाटील, सपकाळ कुटुंबियांना आहे. कुटुंबांबरोबरच शहरातील तरुण, आबालवृद्ध पालखी पळवण्यासाठी पुढे येतात. जी पालखी प्रथम शिलंगण मैदानावर पोहोचते ती जिंकते. ऐतिहासिक पालखी शर्यतीची परंपरा शहरवासीयांनी अखंडपणे जपली आहे. 150 वर्षांहून अधिक काळापासून पालखी शर्यत सोहळा मोठ्या भक्ती भावात आणि जातीय सलोखा राखत उत्साहात पार पडतो.