Vihann News
728x90 Ad Slot

भाळवणी गणात उमेदवारीसाठी रस्सीखेच; इच्छुकांची 'भाऊगर्दी'!

जानेवारी १९, २०२६

भाळवणी (महादेव धनवडे) : भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये भाळवणी पंचायत समिती गण व आळसंद पंचायत समिती गण असे दोन गण येतात. उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग चालू असतानाच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊगर्दी केली असून इच्छुक उमेदवार अभी नही तो कभी नही या इराद्याने मैदानात उतरले आहेत. भाळवणी पंचायत समिती गणामध्ये भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी, पंचलिंगनगर, कमळापूर, जाधवनगर, बलवडी (भा), तांदळगाव अशी आठ गावे येतात. त्यामध्ये भाळवणी हे मतदानाच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे साहजिकच भाळवणी गावाला उमेदवारी दिल्यास तो निवडून येतो.परंतु याचाच आधार घेऊन इतर गावातील इच्छुक उमेदवार मात्र नाराज आहेत. गेले 20-25 वर्षे भाळवणीलाच उमेदवारी मिळते मग यावेळी सर्वसाधारण खुले आरक्षण पडले आहे तर आम्हाला उमेदवारी का नाही याची विचारणा ते आपापल्या नेत्याकडे करीत आहेत.कळंबी, ढवळेश्वर,कमळापूर,बलवडी (भा) या गावातून उमेदवारीसाठी मागणी होत असून यावेळी नेते आमच्या गावचा उमेदवारीसाठी विचार करतील याची शंभर टक्के खात्री इच्छुक उमेदवारांचे समर्थक देत आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडून भाळवणी पंचायत समिती गणातून भाळवणीचे महेश घोरपडे इच्छुक आहेत.गत पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवली होती परंतु यामध्ये पाटील गटाचे संजय मोहिते विजय झाले होते. परंतु काही दिवसापूर्वीच संजय मोहिते यांनीच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेनेचा गड भक्कम झाला आहे. महेश घोरपडे यांनी यापूर्वी भाळवणीचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर भाळवणी सोसायटीचे ते विद्यमान संचालक आहेत.तर त्यांच्या पत्नी भाळवणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत.पंचायत समितीने त्यांना हुलकावणी दिल्याने यावेळी तरी उमेदवारी पदरात पाडून विजय मिळवण्यासाठी ते इच्छुक आहेत.

 त्याचबरोबर भाळवणीचे राजेंद्र पांडुरंग शिंदे यांनी सुद्धा शिंदे गटाकडे पंचायत समितीतून लढण्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा भाळवणी ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत.भाळवणी गावातील शिवसेनेचा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.भाळवणी गणातील युवा वर्गाचा त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठिंबा आहे.

त्याचबरोबर ढवळेश्वर येथील युवा नेतृत्व,सामाजिक कार्यकर्ते सुहास भैयांचे कट्टर समर्थक दिलीप अण्णा किर्दत यांना उमेदवारी मिळावी यासाठी गावकऱ्यांनी सुहासभैयांना साकडे घातले आहे.ढवळेश्वर,कळंबी पंचलिंगनगर,कमळापूर आदि गावातून दिलीप अण्णांच्या उमेदवारासाठी जोरदार वाढता पाठिंबा आहे. आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून ढवळेश्वर गावामध्ये सुद्धा त्यांना उमेदवारीसाठी जोरदार आग्रह होताना दिसत आहे.

त्याचबरोबर बलवडी भा.गावचे माजी सरपंच मारुती पवार यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा बलवडी भा. जाधवनगर,तांदळगाव या गावातून अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुहास भैयाकडे मारुती पवार यांच्या उमेदवारीसाठी लॉबिंग केले आहे. पतसंस्था,दूध संघ यांच्या माध्यमातून माजी सरपंच मारुती पवार यांचे भाळवणी पंचायत समिती गणातील सर्वच गावांमध्ये सलोख्याचे,मितृत्वाचे व पै- पाहुण्यांचे संबंध आहेत. निवडून येण्याची क्षमता असल्याची ते खात्री देत असल्याने त्यांनी या मैदानात उतरून उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

त्याचबरोबर ढवळेश्वर चे लक्ष्मण शेठ, कमळापूरचे राहुल साळुंखे यांनी सुद्धा उमेदवारीसाठी आमच्या नावाचा विचार करावा यासाठी आग्रही मागणी केली आहे.

तर दुसरीकडे भाजपचा भाळवणी पंचायत समितीचा उमेदवार फायनल झाला असल्याचे समजते.

भाजपमधून पंचायत समितीसाठी भाळवणी सोसायटीचे माजी चेअरमन मोहन धनवडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल याची दाट शक्यता आहे.मोहनराव धनवडे यांनी यापूर्वी भाळवणी  ग्रामपंचायतीचे सदस्यपद भूषवले आहे. सामाजिक सलोखा राखून आणि अडी-अडचणीला धावणारे नेतृत्व म्हणून युवकांच्यात ते लोकप्रिय आहेत.अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी गावातील सर्व स्तरातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

भाजपच्या गोटातून बलवडी(भा.)चे माजी सरपंच युवा नेतृत्व प्रवीण पवार हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सांगलीमध्ये भाजपच्या मुलाखती झाल्या त्यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे आपली सविस्तरपणे मुलाखत दिली आहे.बलवडीचे सरपंचपद त्यांनी संभाळले असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे.

 त्याचबरोबर भाळवणीचे तरुण, उमदे नेतृत्व सागर सूर्यवंशी यांनी सुद्धा भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी सांगली येथे झालेल्या मुलाखतीमध्ये युवकांना संधी देण्याची आग्रही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर उच्चशिक्षित असलेले बलवडीचे प्रशांत पवार(सर) यांनी सुद्धा भाळवणी पंचायत समिती गणातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे.

  एकंदरीत उमेदवार कोण फायनल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असून शिवसेनेतून उमेदवारी देताना आमदार सुहास भैया बाबर,अमोल दादा बाबर यांचा मोठा कस लागणार आहे.