नेव्हिगेशन मेनू

मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी फॉर्म वेळेत भरा; प्रशासनाचे आवाहन

sbmarathi By sbmarathi
| जुलै २३, २०२६


विटा शहरात शनिवार-रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम

विटा / खानापूर : खानापूर-विटा विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून, मतदार यादी अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी सर्व मतदारांना बीएलओ (BLO) मार्फत वितरित करण्यात आलेले इन्युमरेशन फॉर्म तातडीने भरून जमा करण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. बांदल यांनी सांगितले की, या पुनरीक्षण मोहिमेद्वारे मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, दुबार किंवा अस्तित्वात नसलेल्या मतदारांची नावे वगळून मतदार यादी शुद्ध केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला इन्युमरेशन फॉर्म अचूक माहिती भरून, आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करून बीएलओकडे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, इन्युमरेशन फॉर्म वेळेत जमा न झाल्यास किंवा फॉर्मवर आवश्यक स्वाक्षरी नसल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही मतदाराने याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी नमूद केले.

विटा शहरात विशेष शिबिरांचे आयोजन

विटा शहरात आतापर्यंत सुमारे ५५ टक्केच इन्युमरेशन फॉर्म जमा झाले असल्याने उर्वरित नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने शनिवार आणि रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेत आपले फॉर्म वेळेत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

परराज्यातील गलाई बांधवांसाठी विशेष सुविधा

व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त परराज्यात वास्तव्यास असलेल्या गलाई बांधवांचे मतदार यादीतील नाव कायम राहावे यासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका प्रौढ सदस्याने संबंधित फॉर्मवर स्वाक्षरी करून २९ तारखेपर्यंत बीएलओकडे जमा करावा. यामुळे संबंधित मतदाराचे नाव यादीत कायम ठेवण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

फोटोबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण

मतदार यादीसाठी सर्व नागरिकांनी नवीन फोटो देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत अस्पष्ट (ब्लर) आहेत, त्यांनीच नवीन फोटो सादर करावेत. इतर नागरिकांनी केवळ फॉर्म भरून जमा करणे पुरेसे आहे.

नवीन मतदारांनी नोंदणी करावी

ज्या युवक-युवतींचे १८ वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यांनी फॉर्म क्रमांक ६ भरून नवीन मतदार म्हणून नावनोंदणी करावी, असेही डॉ. विक्रम बांदल यांनी आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करून आपले इन्युमरेशन फॉर्म वेळेत जमा करावेत, जेणेकरून मतदार यादी अचूक व अद्ययावत तयार होईल आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही.