नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; रात्रीच्या वेळी केबल जाळण्याचा धसका; विषारी धुरामुळे नागरिक त्रस्त!
विटा (प्रतिनिधी) : विटा शहरातील भरवस्तीत रात्रीच्या अंधारात जुन्या लाईटच्या वायरी आणि केबल जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. केबलमधील तांबे आणि ॲल्युमिनियम धातू वेगळा करण्यासाठी उघड्यावर चालणाऱ्या या बेकायदेशीर उद्योगामुळे प्रचंड विषारी धूर पसरत असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
काही स्क्रॅप व्यावसायिक रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे लोकवस्तीच्या मध्यभागी गोळा केलेल्या जुन्या केबल्स, खराब फ्रीज आणि रबरी साहित्य एकत्र करून पेटवून देतात. वायरींवरील प्लास्टिक आणि पीव्हीसी (PVC) जाळल्यामुळे ‘डायॉक्सिन’सारखे अत्यंत घातक आणि विषारी वायू हवेत मिसळत आहेत.
रात्रीच्या वेळी अचानक पसरणाऱ्या या दाट आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे परिसरातील नागरिकांना झोपेतच श्वसनाचा त्रास, अचानक खोकला येणे आणि डोळ्यांची तीव्र जळजळ होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांना या विषारी धुराचा मोठा फटका बसत आहे.
नियमांनुसार स्क्रॅप व्यवसायासाठी औद्योगिक झोनमध्ये जागा, स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी अनिवार्य असून कोणत्याही प्रकारचा कचरा जाळण्यावर हवा प्रदूषण प्रतिबंध व प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट कायद्याने बंदी असताना देखील या परिसरातील स्क्रॅप व्यावसायिकांकडून या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळून येत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
पर्यावरण संरक्षण नियमांनुसार उघड्यावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट, रबर किंवा प्लास्टिक जाळण्यावर कडक बंदी आहे. असे असतानाही विट्यात भरवस्तीत रात्रीच्या वेळी ही जाळपोळ सर्रास सुरू असल्याने नगरपालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
केबल वायर जाळून तांबे काढणे हा थेट गुन्हा असून याबाबतची परवानगी फक्त अधिकृत रिसायकल करणाऱ्यांनाच आहे. तसेच, यासाठी अग्निसुरक्षा विभागाची ना हरकत, फायर सेफ्टी साधने व कामगार सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र, विटा परिसरातील अनेक स्क्रॅप गोडाऊन व्यावसायिक हे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हा कचरा जाळत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया
रात्रीच्या वेळी गस्त घालून अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या स्क्रॅप व्यावसायिकांवर तातडीने दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात असून या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमधून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
