विटा (प्रतिनिधी) : विटा शहरात भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी जुन्या केबल्स, भंगार साहित्य व प्लास्टिक जाळल्याने होणाऱ्या विषारी धुराबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची विटा नगरपालिकेने तात्काळ दखल घेतली आहे. शहरातील कराड रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर भंगार आणि प्लास्टिक जाळून प्रदूषण पसरवणाऱ्या एका भंगार व्यावसायिकावर नगरपालिकेने नोटीस बजावत थेट दंडात्मक कारवाई केली आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईचे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून जोरदार स्वागत होत असून पालिकेचे कौतुक केले जात आहे.
कराड रोड परिसरातील मोकळ्या जागेत आणि सार्वजनिक ठिकाणी जुन्या लाईटच्या वायरी, रबर आणि प्लास्टिक कचरा जाळून त्यातील तांबे-ॲल्युमिनियम वेगळे करण्याचा प्रकार रात्रीच्या आणि भल्या पहाटेच्या वेळी सुरू होता. या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ सहन करावी लागत होती. याबाबत सांगली बिझनेस मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच विटा पालिका प्रशासन तत्परतेने हरकतीत आले.
नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण विभागाने कराड रोड परिसरातील संबंधित भंगार दुकानाची पाहणी केली. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्लास्टिक, केबल्स आणि घातक कचरा जाळून पर्यावरण तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पालिकेने संबंधिताला नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली. यापुढे असा प्रकार पुन्हा आढळल्यास दुकान सील करणे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सक्त इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांकडून प्रशासनाचे कौतुक
नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडित असलेल्या या गंभीर समस्येवर नगरपालिकेने दाखवलेली तत्परता आणि केलेली कठोर कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. "वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित कारवाई केल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यामुळे इतर बेकायदा भंगार व्यावसायिकांनाही नक्कीच चाप बसेल," अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
